Best lady gynecologist in Nashik

गंभीर कोविड संसर्ग झालेल्या गर्भवतीसह बाळाला ‘वोक्हार्ट’ मध्ये जीवदान

नाशिक : कोविडचे संक्रमण होऊन प्रकृती गंभीर झाल्याने जिवास धोका असलेल्या एका गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार करून तिला व तिच्या बाळालाही सुखरूप घरी पाठविल्याची वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय दिलासादायक घटना येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली.

याबाबत माहिती अशी की, 34 वर्षीय सौ. सायली ठाकूर (नाव बदललेले) ही 33 आठवडे 5 दिवस म्हणजे आठ महिन्यांची गर्भवती महिला गंभीर अवस्थेत वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली होती. तिला सर्दी, ताप, खोकला होता आणि श्वास घेण्यास करण्यास त्रास होत होता. तिला तातडीने आपत्कालीन विभागात नेऊन उपचार करण्यात आले. मात्र तिच्या लक्षणांमध्ये वाढ झाली आणि तापही वाढत गेला. एक्स-रे काढला असता कोविड 19 सारखी लक्षणे दिसत होती, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये तिच्या फुफ्फुसात गंभीर संक्रमण दिसून आले आणि तिची अँटीजेन टेस्ट देखील पॉजिटीव्ह आली.

या गर्भवतीला श्वास घेणेही कठीण झाले असल्याने तातडीने पल्मोनोलॉजिस्ट (फुफ्फुस विकार तज्ञ) डॉ. अनिर्बन बंडोपाध्याय यांच्या देखरेखीखाली कोविड आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (सॅच्युरेशन) अचानक 60% पर्यंत खालावली होती. या गंभीर परिस्थितीतच गर्भाशयातील बाळाच्या हालचालीही कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रद्धा सबनीस यांचे मत घेतले गेले. परिस्थिती इतकी कठीण होती की या महिलेचे तातडीने सिझेरियन करून डिलिव्हरी करणे गरजेचे होते. महिलेची परिस्थिती पाहता ही अतिशय जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (हाय रिस्क डिलिव्हरी) होती. त्यातून अतिरक्तस्रावाची शक्यता निर्माण होण्याची किंवा जिवालाही धोका असल्याची शक्यता नातेवाईकांना समजावून सांगून त्यांची संमती घेण्यात आली.

प्रसूतीतज्ञ, भूलतज्ञ यांच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक असे हे गंभीर प्रकरण होते. ती कोविड पॉझिटिव्ह असल्याने, रुग्णालयात इतरत्र संसर्ग पसरू नये यासाठी नकारात्मक दाबाचे (नेगेटिव्ह प्रेशर) वातावरण असलेले एका खास ऑपरेशन थिएटरची आवश्यकता होती, ही उच्च-स्तरीय सुविधा वोक्हार्ट हॉस्पिटल्स नाशिक येथे उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेनंतर अति रक्तस्त्राव, जंतू संसर्ग, आणि कदाचित त्या गर्भवतीच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. पण डॉ. श्रद्धा सबनीस यांनी सिझेरियनची शस्त्रक्रिया सुलभपणे पार पाडली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. सुनित शोत्रीया यांनी सहकार्य केले. अशा शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही क्षणी ऑक्सिजनची पातळी खाली येण्याचा धोका असतो.

सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर बाळाला लगेच नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. दिनेश घरटे यांच्या देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये (नवजात बाळांसाठी असलेला अतिदक्षता विभागात) ठेवण्यात आले. बाळाचे वजन 2.5 किलो भरले. विशेष म्हणजे बाळाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली.

शस्त्रक्रियेनंतर महिलेला पुन्हा कोविड आयसीयूमध्ये हलविण्यात येऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अशा रुग्णांना सलग आणि दीर्घकाळ ऑक्सिजन मिळत राहाणे आवश्यक असते. त्यासाठी कान-नाक-घसा विषयातले तज्ज्ञ सर्जन डॉ. मुकेश मोरे यांनी ट्रॅकोस्टॉमी म्हणजे मानेतून श्वासनलिकेमध्ये नळी टाकून व्हेंटीलेटरद्वारे कृत्रिम श्वसन देण्याची व्यवस्था केली.

या महिलेस प्लाझ्मा देखील देण्यात आला. या काळामध्ये तिच्यावर सर्व तज्ञांनी उपचार केले, हळू हळू तिची प्रकृती सुधारत गेली आणि ती व्हेंटिलेटर वरून बाहेर निघाली. तिने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि 17 व्या दिवशी बाळासह तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.

वोक्हार्ट हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रशासन प्रमुख डॉ. निलेश गुमरदार म्हणाले की, गर्भवती व तिचे बाळ असे दोन्ही मौल्यवान जीव वाचविण्यात डॉ. अनिर्बन बंडोपाध्याय, डॉ. श्रद्धा सबनीस, डॉ. दिनेश घरटे, डॉ. सुनित शोत्रीया, संपूर्ण आयसीयू टीम, ओटी टीम आणि नर्सिंग टीम यांनी खूप मोठे योगदान दिले. हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ. संदीप पटेल म्हणाले की, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, सक्षम अतिदक्षता विभाग, अनुभवी डॉक्टर आणि कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी हे वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे वैशिष्ट्य नाशिकमधील रुग्णांसाठी कायमच उपयुक्त ठरत आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *