आईव्हीएफ केल्यानंतर 39 वर्षीय स्त्रीला दिवस राहिले आणि होणारी मुले जुळी होती. सर्व काही व्यवस्थित घडत असतांना अचानक गरोदरपणाच्या 29व्या आठवड्यात तिला प्रसवपूर्व वेदना जाणवायला लागल्या...
नाशिक – आजकाल बदलती जीवनशैली आणि रोजच्या जीवनातील वाढत्या ताणतणावामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात संतती प्राप्तीसाठी आईव्हीएफ आणि आईयूआय सारख्या नवीनतम उपचारपद्धतींकडे जोडप्यांचा कल वाढत चालला आहे. बऱ्याच वेळा आईव्हीएफ केल्यानंतर यश मिळतेच पण नंतरच्या काळात प्रसूतीमध्ये अडचणी येतात आणि संभाव्य धोका असतो. सोबतच गरोदरपणात किडनीविकार, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असणे यालाच वैद्यकीय भाषेत “हाय रिस्क प्रेगनंसी” असे म्हणतात.
अशीच एक घटना नुकतीच घडली ज्यात आईव्हीएफ केल्यानंतर 39 वर्षीय स्त्रीला दिवस राहिले आणि होणारी मुले जुळी होती. सर्व काही व्यवस्थित घडत असतांना अचानक गरोदरपणाच्या 29व्या आठवड्यात तिला प्रसवपूर्व वेदना जाणवायला लागल्या. नियोजित काळाच्या आधीच प्रसववेदना जाणवायला लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्क्षणी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे ठरवले. प्रकृती गंभीर असल्याकारणे प्रसूती घडून आणणे जोखमीचे होते म्हणूनच तब्बल चार रुग्णालयातून त्यांना उपचारासाठी नकार मिळाल्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे तिला दाखल करण्यात आले.
वोक्हार्ट हॉस्पिटल येथे आल्यावर प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रद्धा सबनीस यांनी रुग्णाची तपासणी केली असता रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता, रक्तदाब वाढलेले होते, पोट आणि पायावर सूज आलेली होती आणि पोटात खुप वेदना जाणवत होत्या अशी लक्षणे दिसली. तिचे रक्तदाब एवढे जास्त जास्त होते कि कुठल्याही क्षणी तिला फिट्स आले असते आणि अश्यावेळी मेंदूतील नस फाटण्याची शक्यता असते, हि खूप गंभीर परिस्थिती होती. काही तपासण्या आणि सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात आले कि पहिल्या बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे तर दुसऱ्या बाळाचे हृदयाचे ठोके जाणवत नव्हते, डिलिव्हरीनंतर बाळांचे जगणे अवघड वाटत होते.
इतर सर्व चाचण्या केल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, हृदयविकार तज्ञ, फिजिशियन आणि भूल तज्ञ यांचे मत घेऊन रुग्णाला इमरजेंसी सिझेरियन डिलिव्हरी साठी ऑपेरेशन थिएटर नेण्यात आले. खरंतर हि शस्त्रक्रिया अवघड होती पण तज्ञांनी हे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले. तज्ञांने आपले अनुभव आणि कौशल्य पणाला लावले आणि सुखरूप डिलिव्हरी करण्यात आली. पहिल्या बाळाचे वजन 1100 ग्राम आणि दुसऱ्या बाळाचे वजन 800 ग्राम एवढे मोजले गेले. तज्ञांनी डेलिव्हरी बाबत वेळीच आणि योग्य निर्णय घेतल्याने दोन्ही बाळ जन्मानंतर लगेच रडले, हि त्यांना दिलासा देणारी बाब होती. बाळांचे वजन कमी असल्या कारणाने त्यांना तातडीने वोक्हार्ट हॉस्पिटल येथील सुसज्ज “नवजात शिशु अतिदक्षता विभागात” पुढील उपचारांसाठी ठेवण्यात आले.
या बद्दल अधिक माहिती देतांना डॉ. श्रद्धा सबनीस म्हणाल्या कि डिलिव्हरी नंतर या रुग्णाच्या किडन्या निकामी झाल्या तिच्यावर डायलिसिस करावे लागले आणि सर्व जरुरी वैद्यकीय मदत मिळवून दिली गेली. भूलतज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, हृदयविकार तज्ञ, किडनीविकार तज्ञ, फिजिशियन आणि नवजात शिशु तज्ञ या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि शस्त्रक्रियेच्या सात दिवसानंतर तिला रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत सर्व तज्ञ आणि सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध असल्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आल्याचे डॉ. श्रद्धा सबनीस यांनी सांगितले.